मुंबई : दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि घटत चाललेले अन्नधान्याचे उत्पन्न ही जगासमोरची मोठी समस्या आहे. या समस्येवर मात म्हणून शेतीचे अधिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर केला जात आहे. रासायनिक खतांच्या वापरामुंळे शेतींच्या उत्पादनात वाढ होते हे खरे आहे परंतुं ही उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते किंवा काही मर्यादीत स्वरूपाची असते. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की, त्याचे परिणाम पिकांवर होताना दिसून येतात.त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतांसह कीटकनाशक आणि बुरशीनाशकांमधील रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे व भाज्या खाण्यालायक राहत नाहीत.या खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत तर चालचाच आहे परंतु मानवाच्या आरोग्याचा देखील प्रश्न निमार्ण झाला आहे.
शेतकरी मित्रांनो जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. हेच घटक जमीन सजीव आणि सुपीक करण्याचे कार्य करतात.आपण वापरलेले रासायनिक खत जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जमिनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव होत जाते. परिणामी सुपीक जमीन नापीक होत जाते.
रासायनिक खतांचा जमिनीवर होणारा दुष्परिणाम –
१)जेव्हा सेंद्रीय पद्धतीने शेती केली जात असायची तेव्हा पीक हे २-३ वेळा पाणी देऊनही येत असायचे परंतु आता पिकाला पाण्याची तीन पटीने गरज वाढली आहे. परिणामी पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीतील भूजल साठाही कमी कमी होऊ लागला आहे.
२)रासायनिक खतांच्या वापरामुळे वनस्पतींची वाढ चांगली होते. मात्र, रोग प्रतिकारक शक्ती कमी होत जाते.त्यामुळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्यांचे खर्च वाढले आहे.
३)जमिनीला अनेक दिवसांपासून रासायनिक खतांचा मारा सुरू आहे. त्यामुळे जमिनीत रासायनिक खतांचे काही घटक विरघळले आहेत. हेच रासायनिक खतांचे अंश पाण्यात उतरले आहेत. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे.
आपले आरोग्य जर सुदृढ आणि निरोगी ठेवायचे असेल तर रासायनिक खतांचा होणारा वापर कमी करून सेंद्रीय पद्धतीनेच शेती पिकवली पाहिजे.सेंद्रीय पद्धतीने शेती पिकवली तर जमिनीचा कमी झालेला पोतही वाढेल आणि मानवाचे आरोग्यही निरोगी राहील. मग चला तर शेतकरी मित्रांनो आपले जीवनमान वाढविण्यासाठी शेतीत रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर कमी करूया!