मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो त्याचे मत अगदी दिलखुलासपणे मांडत असतो. सामाजिक राजकीय मुद्द्यावर नेहमी तो आपल्या प्रतिक्रिया देत असतो. सध्या अनुराग कश्यप त्याच्या ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुरागणे दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, “तुम्हाला कसं कळतंय की दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतायत. तेलुगूमध्ये एखादा चित्रपट चालतो. तमिळ आणि कन्नडमध्ये तसंच आहे. तिथला प्रत्येक चित्रपट काम करत आहे हे तुम्हाला कसं कळतं? मागच्या आठवड्यात कोणता चित्रपट प्रदर्शित झाला याची तुम्हाला कल्पना नसेल. कारण कोणी त्या चित्रपटाकडे फिरकतही नाही.”
पुढे अनुराग म्हणाला, “महत्वाची समस्या ही आहे की लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. पनीरवर देखील जीएसटी लावण्यात आला आहे. खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारत आहात. त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व बहिष्काराचा खेळ खेळला जातोय. लोक चित्रपट पाहण्यासाठी जातात जेव्हा त्यांना खात्री असते की चित्रपट चांगला आहे. पण जर खाद्यपदार्थांवर जीएसटी लावल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसे कोठून आणतील.” अनुराग कश्यपचे वक्तव्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.