मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्टपासून सुरू झाले. ग्रामीण रस्त्यांसाठी शासनाने भरीव निधी उपल्बध करून द्यावा अशी मागणी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांनी विधानसभेमध्ये केली आहे.
अधिवेशनात बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, आस्तित्वात असणाऱ्या परंतु नकाशावर नसलेल्या रस्त्यांच्या कामासाठी शासनाने विशेष कार्यक्रम राबवावा, ग्रामीण रस्ते सुधारणेसाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी व ग्रामीण रस्त्यांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी राहुल कुल यांनी केली. दरम्यान, यापूर्वीही आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनामध्ये शेत रस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्ते इत्यादी शेतकऱ्यांच्या अत्यंत गरजेचे असलेले प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते व त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती.
यंदा गणपती बाप्पाचं जोरदार आगमन होणार, जाहीर केली ‘ही’ नियमावली
त्याचबरोबर राहुल कुल यांनी विधानसभेमध्ये प्राथमिक शाळांच्या दुरावस्थेबाबत देखील प्रश्न उपस्थित केला. राज्यातील अनेक ठिकाणी प्राथमिक शाळांच्या इमारती या जुन्या व जीर्ण झाल्यामुळे लहान मुलांना धोकादायक इमारतींमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. प्राथमिक शाळांच्या इमारतींसाठी कुठलीही ठोस योजना नसल्याने अनेक ठिकाणी मागणी असून देखील खूप कमी प्रमाणावर शाळांच्या खोल्यांची बांधकामे मंजूर होतात, डागडुजी केली जाते याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, प्राथमिक शाळांच्या वीजबिलाबाबत निर्णय घेण्यात यावा तसेच महानगरपालिकांमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बाबत अजूनही अनिश्चितता असून त्याबाबत देखील शासनाने निर्णय अशी मागणी राहुल कुल यांनी विधानसभेत केली.