नागपूर रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या संघमित्रा एक्स्प्रेस ट्रेनच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रामसेवक भुहिया ( वय ३८ ,रा.औरंगाबाद, बिहार ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ; शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, बंगळुरूहून दानापूरला जाणारी संघमित्रा एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. यावेळी उतरणारे प्रवासी रेल्वे डब्याच्या दरवाजाजवळ येऊन थांबतात. या दरम्यान, काही प्रवासी शौचास जाण्यासाठी शौचालयाच्या बाहेर थांबले होते. बराच वेळ होऊन गेल्यानंतरही शौचालयाचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे बाहेर थांबणाऱ्या प्रवाशांनी दरवाजा वाजवला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली.
घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला गंभीर इशारा; म्हणाला, “महाराष्ट्राचा बिहार करू नये नाहीतर…”
प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर , रेल्वे सुरक्षा कर्मचारी तात्काळ तेथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडला असता आतमध्ये त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती जवळ सापडलेल्या आधार कार्ड नुसार आणि रेल्वे तिकीटानुसार; तो बिहार मधील औरंगाबादचा रहिवासी आहे. यासंदर्भात लोहमार्ग पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून; पुढील कारवाईसाठी मृतदेह इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.