Maratha Reservation । बार्शी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच अजूनही सुटला नाही. राज्य सरकारकडून आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्या, त्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांनी घेतलेला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सासुरे या गावातील एक महिला उपोषणाला बसली आहे. परंतु या महिलेची तब्येत खालावली आहे. वैशाली आवारे (Vaishali Aware) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचं मागील तीन दिवसांपासून अखिल भारतीय छावा संघटनेच बार्शीत आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहणार आहे असा निर्णय आवारे यांनी घेतला आहे. काल मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. आज सरकारचे प्रतिनिधी संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर हे मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे पाटील आज उपोषण मागे घेतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
गावकऱ्यांच्या आग्रहाखातर घेतली सलाईन
राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी रविवारपासून औषध आणि पाणी त्यागल आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली आहे.