Bus Accident । कर्नाटकातील हावेरी येथे स्कुल बसचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूल बस उलटली असून चालकासह चार मुले गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय 12 मुलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारला टाळण्यासाठी बसचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कूल टूर बस रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर तालुक्यातील सज्जनगुड्डा येथील सरकारी शाळेची आहे. सज्जनगुड्डा येथील शासकीय शाळेतील विद्यार्थी मंगळवारी हावेरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सहलीला गेले. येथील उत्सव रॉकगार्डकडे जात असताना सावनूर तालुक्यातील अल्लीपुरा क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या कारला टळत बसचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली.
यावेळी बसमध्ये ५३ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करत होते. या घटनेत बस चालकासह तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हुबळी येथील KIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 12 मुलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सावनूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. स्थानिक शाळेत मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सावनूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ही घटना सावनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.