मुंबई : राज्य सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतलाय. मागच्या दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती आता शिंदे फडणवीस सरकारकडून केली जाणार आहे. राज्यामध्ये जवळपास २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती येत आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्वत: प्रसार माध्यमांना दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. जवळपास पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.”
व्हायरल व्हिडीओने फेमस झालेल्या अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली चित्रपटात गाण्याची संधी
पुढे फडणवीस म्हणाले, “या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरच करू. साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली असून १२ हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत.” राज्य सरकारच्या या निर्णयाचा पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यभरातील लाखो तरूणांसाठी निश्चितच फायदा होणार आहे.