![Sharad Pawar is going to meet the family of Sanjay Raut. Read in detail](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/08/Sharad-Pawar-1-1024x538.jpg)
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांची कोठडी 8 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यावर भाजपा आणि ईडीविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केलेल्या आहेत. याचसोबत शिवसेना पक्ष तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने या कारवाईवर आक्षेप घेतला होता.
संजय राऊतांच्या अटकेवर राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत आपल मत मांडले परंतु राष्ट्रवादीचे अक्ष्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळेच शरद पवार यांनी अद्याप मौन का बाळगले आहे? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, पवार कुटुंबीय जनतेला उत्तरदायी आहे.
एका वृत्तवाहिनीने शरद पवार संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर जाऊन संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं वृत्त दिलं होतं. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार देखील असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सध्या शरद पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. राऊतांच्या घरी दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर ते जाणार आहेत असे म्हटले जात आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून तयारी केली जात आहे.