अमरावती : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन्स सत्र २’ च्या परीक्षेत अमरावतीमधील (Amravati) श्रेणिक मोहन साकला (Shrenik Mohan Sakala) हा शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. ही परीक्षा २ ते ३० जुलैच्या दरम्यान घेण्यात आली होती. आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील २४क हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली आहे.
या यशाबद्दल श्रेणिक म्हणाला, “आयआयटी’मधून पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून ‘कॉम्प्यूटर सायन्स’मध्ये आपल्याला उच्च शिक्षण घ्यायला आवडेल. कोरोना काळामुळे मी जास्तीस्त जास्त स्वयंअध्ययनावर भर दिला. दिवसातून फक्त सहा ते सात तास अभ्यास केला. परंतु, या दरम्यान माझी एकाग्रता ढासळू दिली नाही. माझी लहान बहीण पण यावर्षी दहावीची परीक्षा देत होती त्यामुळे घरातील वातावरण अनुकूनल होते. तसेच आमच्या आईने अभ्यासाच्या वेळेत लक्ष विचलित होऊ नये, याची खूप काळजी घेतली”.
श्रेणिकचे वडील मोहन साकला हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वडुरा या गावी स्वत:चा शेतीव्यवसाय करतात. त्यांचे देखील शिक्षण होऊन त्यांनी नोकरी केली आहे. पण काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.