मुंबई : 5 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार होता. पण आता या प्रकरणातील सुनावणी 8 ऑगस्टवर गेल्याने मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार की नाही तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) याबाबत काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला टोला लगावला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले,“आमचा न्याय देवतेवर पूर्णपणे विश्वास आहे. यावर मी काही बोलू इच्छित नाही कारण विषय न्यायप्रविष्ट आहे,” असं म्हणाले. पुढे आदित्य यांनी राज्यघटनेचा संदर्भ देत, “असे गट कुठेही सरकारं बनवायला लागले तर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता निर्माण होईल. हा प्रत्येक राजकीय पक्षासाठी धोका निर्माण होईल,” असं देखील मत मांडलं.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही बंडखोर तिथे जात असाल तर तिथे आनंदात राहा. तरी तुम्हाला तिथं राहायचं असेल तर निवडणुकीला सामोरे जा. जनता जे ठरवेल ते मान्य असेल आम्हाला,” असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.