मुंबई : जेष्ठ सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं दुःखद निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका होऊन त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रदीप पटवर्धन यांनी मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला दुःखद धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांचा फोटो शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.
सुप्रिया सुळेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ज्येष्ठ अभिनेते प्रदिप पटवर्धन यांच्या निधनामुळे रंगभूमीवरील एक हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.त्यांनी ‘मोरुची मावशी’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,गोळा बेरीज अशा अनेक चित्रपटांतून देखील भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.
दरम्यान,प्रदीप पटवर्धन यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मराठी रंगभूमीवरील महत्वपूर्ण कलाकार म्हणून त्यांना ओळखलं जायचं.