मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवन या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊ जण आणि भाजपातून नऊ जण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली.
या कालावधी मध्ये बंडखोरी केलेल्या अनेक नेत्यांनी मुंबईला जाऊन शिंदेंच्या सत्काराचे कार्यक्रम घेतले आहेत. अस केलेल्या नेत्यांमध्ये कोणाला मंत्रीपद भेटणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून होते. पण अपेक्षित असलेल्या नावांपैक्की अनेकांची नावे मागे ठेवण्यात आलेली आहेत.
यामध्ये औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट,महाडचे आमदार भरत गोगावले, ओवळा-माळीवाडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे या नेत्यांची नावे मागे ठेवण्यात आलेली आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला समजल जात या जिल्ह्यामध्ये मंत्रिमंडळात एकूण तीन मंत्रिपद देण्यात आलेली आहेत. पैठणचे आमदार संदिपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि औरंगाबाद मध्य मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांना मंत्रिपद मिळालेली आहेत.
दरम्यान, आता शिंदे-भाजप सरकारने उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला शह देण्यासाठी अतिशय नियोजनपूर्वक मंत्रिपदे दिलेली आहेत अश्याच चर्चा सगळीकडे सुरू आहेत.