
पुणे : ॲमेझॉन इंडिया आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यात अन्नसुरक्षा व दर्जेदार शेतमाल उत्पादन आणि विपणन याबाबत तांत्रिक मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण विषयीचा सामंजस्य करार झाला. दर्जेदार शेतमाल उत्पादित करणे आणि त्याची ॲमेझॉनच्या माध्यमातून बाजारपेठेत विक्री करणे या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल मेहेर यांनी दिली.
अमेझॉन रिटेल कंपनी ही जागतिक स्तरावरील नावाजलेली विपणन क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी शेतमाल विपणन या क्षेत्रात गेली दोन वर्ष नैतिकतेने काम करत असून ग्राहकांना अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दर्जेदार व विषमुक्त भाजीपाला फळे पुरवण्याचे काम करत आहे.
अमेझॉन रिटेल हा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्यासोबत राबवणार होते परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी भारतातील एका कृषी विज्ञान केंद्रासोबत प्रकल्प राबवण्यासाठी सूचना केली. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प राबवण्याचे ठरले आणि त्यामध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र निवड केली असे डॉक्टर शोभणे यांनी सांगितले.
या करारामुळे दर्जेदार शेतमाल व विषमुक्त भाजीपाला उत्पादित करून त्याची विक्री व्यवस्था करण्यासाठी फायदा होणार आहे. ॲमेझॉन रिटेल ही कंपनी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने चांगले काम करत आहे. ही कंपनी ग्राहकांना ताजा व चांगला दर्जेदार भाजीपाला वेळेत घरपोच सेवा देण्यासाठी कंपनीने मागील दोन वर्षापासून संकलन केंद्र चालू केले आहे. भविष्यात हा प्रकल्प यशस्वी झाल्यास देशभरात असा प्रकल्प राबवला जाईल.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल मेहेर वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, राहुल घाडगे, योगेश यादव, डॉ.दत्तात्रय गावडे, धणेश पडवळ, ॲमेझॉन इंडिया प्रमुख पराग भौमिक, अन्नसुरक्षा विभागाचे प्रमुख अभितोष कुमार, डॉ. शशिन शोभणे, तेजस जाधव आदी उपस्थित होते