
मुंबई : कृषी खात्याचा पदभार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे देण्यात आला आहे. पदभार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांदा विदर्भामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता या नुकसान भरपाईबाबत राज्यसरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. जिरायतील हेक्टरी 13 हजार 600 अशी रक्कम ठरविण्यात आली असून त्यानुसार मदत मिळणार आहे.
विधीमंडळात विरोधकांनी राज्यामध्ये ओल्या दुष्काळाची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. पण ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे नुकसानभरापाईबाबत आता सोमवारी निर्णय घेतला जाईल असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी मिळणार किती मिळणार याबाबत सर्व माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी सांगणार आहेत.
सतत पाऊस चालू असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत विरोधक आणि प्रशासनाकडूनही पीक पाहणी केलेली आहे. आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे देखील पीक पाहणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. शिवाय या पाहणीनंतर भरपाईबाबत काय निर्णय़ होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.