Ajit Pawar । सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातीलच एक मोठी राजकीय घडामोडी काल घडली आहे. पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली आहे बाणेर रोडवर प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याच देखील सांगण्यात आलं. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
या भेटीवरून राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ काढत आहेत. कारण शरद पवार यांना भेटल्यानंतर अजित पवार आता थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. अजित पवार गट सत्तेत असून शरद पवार गट विरोधी पक्षात आहे. यानंतर या दोन्हीही गटांनी चिन्हावर आणि पक्षावर आपला दावा सांगितला. सध्या या प्रकरणाची निवडणूक आयोगात सुनावणी देखील सुरू आहे.
दरम्यान, काल शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला गेल्याने विविध चर्चा सुरू आहेत. अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली आहे. मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समोर आले नाही.