Ajit Pawar । सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे. यामध्येच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडून पुण्यातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये उमेदवारांच्या अदलाबदलीचा फॉर्मुला राबवला जाण्याची शक्यता आहे.
मागच्या दोन दिवसापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या फॉर्मुल्याप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे या फॉर्मुल्यातील पहिले उमेदवार असल्याची शक्यता आहे. या फॉर्मुल्याप्रमाणे शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर आणखीन काही नावांची घोषणा होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील टार्गेट 45 पूर्ण करण्यासाठी महायुतीतील उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.