मुंबई : टीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाला असून या प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे देखील नाव घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणी शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाण पत्रे रद्द करण्यात आल्याची माहीती समोर येत आहे. या प्रकरणावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “टीईटी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करावी. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कठोर शासन व्हावं. ज्याची चूक असेल ते कळावं आणि कुणाची चूक नसेल तेही समोर यावं. पण या घोटाळ्याबाबत कोणत्याही दबावाला बळी न पडता, खोलवर जाऊन चौकशी करावी अन् खरं चित्र लोकांसमोर यावं. दोषींवर कारवाई व्हावी”.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेकडून घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्याची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असुन त्यांना परीक्षा देण्यास कायमस्वरूपी बंदी केली आहे.