
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाचं मागच्या दोन आठवड्यांपूर्वी निधन झाले. केतकीच्या भावाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या आत्महत्येमुळे माटेगावकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. आता दोन आठवड्यानंतर केतकीने भावासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
केतकी माटेगावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. केतकीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रावरून दोघांचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “माझा अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको लिहू…२१ वर्षाच्या आठवणी शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवातच तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांपासून होते. मला हे क्षण माझ्यापासून कधीच लांब करायचे नाहीत. किती आणि केवढ्या आठवणी आहेत.”
पुढे तिने लिहिले की, “अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाझामध्ये हरवून जाणारा अक्षु. गजल, ठुमरी तर कधी हरिहरन, पिंक फ्लॉइड ऐकणारा अक्षु. भारतीय शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉलमधलं ज्ञान आत्मसात करणारा अक्षु. असा अक्षु मला सोडून गेला.”
सध्या केतकीची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी देखील या पोस्टवर कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत.