
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. काल (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
उद्धव ठाकरे देखील आज मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. मात्र पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याची माहिती समोरआली आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी पुण्यामध्ये शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते सामील झाले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या घोषणाबाजीमुळे शिंदे गटाने देखील यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. नंतर काही वेळात पोलिस या ठिकाणी दाखल झाले असून परिस्थिती आटोक्यात आली.