
मुंबई : काल राज्यभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. पण मुंबईमध्ये (Mumbai) दहहंडी फोडताना काल मुंबईमध्ये १११ गोविंदा, तर ठाणे (Thane) शहरामध्ये ३७ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या गोविंदावर (Govinda) शासकीय आणि महापालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मुंबईमधील ८८ गोविंदाना उपचार करून घरी सोडले तर २३ जण रुग्णालयामध्ये दाखल आहेत. ठाण्यामधील २९ जखमी गोविंदांना उपचार करून सोडले तर ८ जणांवर उपचार सुरू आहेत.
बऱ्याच ठिकाणी गोविंदा पथकाने नियम मोडल्याचे दिसून आले आहे. मानवी मनोरे रचण्यासाठी १४ वर्षांखालील मुलांचाही जास्त प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आवाजाच्या मर्यादेचे देखील उल्लंघन झाले. कोरोनानंतर तब्ब्ल दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी कार्यक्रम पार केला.
दरम्यान, अनेक गोविंदा पथकातील गोविंदानी दुचाकीवर स्वार होऊन दुचाकीचे नियम मोडले आहेत. एका गाडीवर तीन ते चार गोविंदा जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुचाकीस्वारांचा स्वैरसंचार होता. टेम्पो, ट्रकमधून नियमबाह्य पद्धतीने गोविंदांची वाहतूक करण्यात येत होते.