मुंबई : गायक राहुल जैन (Rahul Jain) विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका 30 वर्षीय कॉस्च्युम स्टायलिस्टने (costume stylist) दाखल केली आहे. मुंबईमधील अंधेरी या ठिकाणी राहुलने त्याच्या घरी बलात्कार केला असा आरोप स्टायलिस्टने केलाय. ११ ऑगस्टला हा संपूर्ण प्रकार घडल्याचं स्टायलिस्टने सांगितलं आहे. याप्रकरणी राहुल विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
माहितीनुसार, राहुलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामद्वारे स्टायलिस्टशी संवाद साधला. त्यानंतर राहुलने तिच्या कामाचं कौतुक करत त्याने आपली पर्सनल स्टायलिस्ट म्हणून तिची नेमणूक करण्यासाठी आश्वासन दिलं. यासाठी त्याने त्याच्या अंधेरीतल्या फ्लॅटमध्ये तिला बोलावले . ११ ऑगस्ट रोजी ती त्याच्या घरी गेली असता काम देण्याचं आश्वासन देत राहुलने तिच्यावर बलात्कार केला. राहुलने तिच्यावर हल्ला केला आणि नंतर सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असा आरोप संबंधित स्टायलिस्टने केला आहे.
या प्रकरणावर बोलताना राहुल म्हणाला, “मी या महिलेला ओळखत नाही ती माझ्यावर खोटे आरोप करत आहे. याआधी देखील एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही महिला त्या महिलेची सहकारी असू शकते. असा दावा राहुलने केला आहे. राहुलवर बलात्काराचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी देखील राहुल आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांवर बलात्कार केल्याचा आरोप होता.