मुंबई : जेष्ठ सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं दुःखद निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका होऊन त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रदीप पटवर्धन यांनी मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
प्रदीप पटवर्धन यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाचा परिपूर्ण अविष्कार होता. त्यांचा अभिनय पाहणं, ही एक पर्वणी होती. त्यांचं जाणं म्हणजे रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रासाठी मोठा धक्कादायक बाब आहे. त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण अश्या या खळखळून हसवणाऱ्या व्यक्तीने आज शेवटचा श्वास घेतला.
प्रदीप पटवर्धन यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मराठी रंगभूमीवरील महत्वपूर्ण कलाकार म्हणून त्यांना ओळखलं जायचं.