
Bjp । 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्ष (BJP) सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालानुसार, भाजपने 4,340.47 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे, जे राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 74.57 टक्के आहे. यातील 91 टक्के म्हणजेच 3,967 कोटी रुपये स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांमधून आले आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसने 1,225 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले असून, यामध्ये 171 टक्क्यांची वाढ झाली आहे. काँग्रेसला 1,129 कोटी रुपयांचे उत्पन्न अनुदान आणि देणग्यांद्वारे मिळाले. त्याचवेळी, माकपने 167 कोटी रुपये उत्पन्न केले आणि बसपाने 64 कोटी रुपये कमावले, तर ‘आप’ ने 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, त्याला 34 कोटी रुपये खर्च आले.
राष्ट्रीय पक्षांचा खर्च निवडणूक प्रचारावर सर्वाधिक झाला असून, भाजपने 1,754 कोटी रुपये निवडणूक प्रचारावर खर्च केले, तर काँग्रेसने 619 कोटी रुपये खर्च केले. माकप, बसपा आणि ‘आप’ या पक्षांनी प्रचारासाठी कमी खर्च केला. ज्या प्रकारे काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, त्याचवेळी ‘आप’ आणि बसपाच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येते.