बैल पोळा म्हटलं की आठवतो, वर्षभर शेतात राबणाऱ्या जीवांचा आनंदोउत्सव. जीवनदात्रीचं ऋण फेडू पाहणाऱ्या गोवंशा प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा मानवी दिवस. अर्थात कृषीप्रधान देशाचा कृषी पुरक सन! मानवाला शेतीचा शोध लागल्यापासून ते आजच्या एकविसाव्या शतकातील यंत्राधारित शेतीपर्यंत, गोवंश हा नेहमीच शेतीला पूरक ठरला आहे. अशोक स्तंभावरील बैलाच्या आकृतीला कठोर परिश्रम, मेहनत आणि स्थिरतेचे प्रतिक मानल्या जाते. तस् पाहिलं तर बैल हा ओझेवाहू प्राणी, शेतीला पूरक म्हणूनच निसर्गाने त्याची निर्मिती केली असावी. धन्याप्रती इमान राखत, शेतीकरिता राबण्यातच आपल्या जिविताचे साफल्य आहे; हे त्या निष्ठावंताला चांगलाच ठाऊक! म्हणूनच उभी हयात आपल्या धन्या बरोबरीने काळ्या आईच्या सेवेत तो घालवतो. बैलपोळा हा त्या कष्टाळू प्राण्यांसाठीचा सुट्टीचा दिवस. आज मात्र त्याच्या खांद्यावर कोणत्याही प्रकारच ओझ टाकल्या जात नाही. टाकल्या जाते ती, सुरेख नक्षीकाम केलेल्या कापडाची रंगीबेरंगी झुल. अगदी शरद ऋतूतील नृत्यमग्न चांदण रातीसारखी शोभून दिसावी तशी शोभून दिसते ती त्याच्या भारदस्त खांद्यावर. सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा पद्धतीच्या साजशृंगात बैल अधिकच सुंदर दिसतात. या दिवशी शेतकरी बैलांची आंघोळ व पूजा करून त्यांना पोळ्याच्या मिरवणुकीत अथवा देवदर्शनाला घेऊन जातात.
पोळ्याची पूर्वतयारी अशी करतात !
खरंतर पोळा सणाच्या आदल्या दिवशी, ज्याला विदर्भात “खान मोईन” असं नावं आहे. या दिवशीच “आज आवतण घ्या अन् उद्या जेवायला या“ असे बैलांना सांगून त्यांना ठोंबरा खाण्याकरिता आमंत्रित केले जाते. तसेच वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांचे खांदे नरम पडावे म्हणून त्यांना तुपाने किंवा हळदीने शेकतात याला ‘खांद शेकणे’ अथवा ‘खांड शेकणे’ असे म्हणतात. आधल्या दिवशी बैलांना खारी, साबण, लावून धून काढतात, त्यांची आंघोळ घातली जाते. बैलांचे शिंग घासून त्यांना रंग दिल्या जातो. पोळ्याच्या दिवशी मात्र बैल गाडीला जुंपता येणार नाही, म्हणून आधीच बैलांकरिता शेतातून चारा आणून घेण्याची काळजी शेतकरी घेतात. अशा प्रकारची पूर्वतयारी पोळ्याच्या आधल्या केली जाते. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलाला आंघोळ घालून नानाविध प्रकारचा साज चढविला जातो. त्यानंतर शेतकरी बैलांची व पशूधनाची पूजा करतात. काळाच्या ओघात बैल गेले आणि ट्रॅक्टर आले. त्यामुळे अनेकांकडे बैल असत नाही. अशा वेळी ज्यांच्याकडे बैल नसतात ते लोक घरी मातीच्या बैलाची पूजा करतात.
असा भरतो परंपरागत बैलपोळा !
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही बैलपोळा भरवून बैलांची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावातील सर्व लोकांच्या बैल जोड्या येत असतात. वाजंत्री ढोल , ताशे वाजवून गावातील सर्व बैलांना एका ठीकानी जमा करण्यासाठी आवाहन करतात. गावातील सर्व बैल जोड्या एका ठिकाणी जमल्या की पोळा भरविला जातो. या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यांनतर ज्या ठिकाणी हा पोळा भरतो त्या ठिकाणी तोरण बांधण्यात येते. आता गावातील पाटील किंवा गावचा प्रतिष्ठित व्यक्ती हे तोरण तोडून गावातील भरलेला पोळा फोडत असतो. याचवेळी यंदा मानाचा बैल कोणत्या रंगाचा असणार. हे गावाचा ब्राम्हण पंचागात पाहून सांगतो. त्यानंतर मानाचा बैल ठरवण्यात येतो. या मानाच्या बैलाला कणकीचा घाट खाऊ घालतात. त्यानंतर आरती होते आणि मिरवणूक काढल्या जाते. या मिरवणुकीत मानाचा बैल सर्वात पुढे असेल. कोणताही बैल मानाच्या बैलापुढे जाणार नाही असा दंडक असतो. मिरवणूक संपल्यानंतर घरी नेऊन त्यां बैलांना ओवाळतात. हा पारंपारिक पोळा बघायला गावातील लोकांची गर्दी जमलेली असते. ही परंपरा काही गावांमध्ये अजूनही पूर्वीसारखीच जपल्या जाते. महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. घर सजवले जाते, घरासमोर रांगोळी काढली जाते, नैवेद्य केला जातो. घरसमोर बैल आल्यानंतर तिथल्या महिला त्याची पूजा करून ठोंबरा आणि नैवेद्य खाऊ घालतात.
मला अजूनही आठवते लहानपणी आम्ही सर्व मित्र पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मातीचा बैल घेऊन “तान्हा पोळा” मागत गावभर फिरायचो. कुणी रुपया,दोन रुपये तर कुणी भिस्किट गोळ्याच्या स्वरूपात तान्हा पोळा द्यायचे. मुख्यत्वे जास्तकरून लोक नुसती साखरच आमच्या हातात ठेवत असत. विलक्षण अनुभव होता हा. आजही हा प्रकार गावाकडे पहायला मिळतो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो. कृतज्ञता ही मानवी मनातील एक अत्युच्च उदात्त भावना आहे. म्हणूनच कृतज्ञतेचा हा सोहळा जपण्यासारखा आहे. या दिवशी बैलांना विश्रांती तर दिली जातेच, पण इतर अनेक मार्गांनी त्यांना उत्तमोत्तम खाद्य देण्यापासून, त्यांना विविधप्रकारे सजवणे, त्यांच्या मिरवणूका काढणे इत्यादी गोष्टीही केल्या जातात. खरे तर, शेतकरी बैलांना फक्त पोळ्याच्या दिवशी विश्रांती देतो, असे नाही. शेतकर्यांनी प्रत्येक आठवड्यातील एक विशिष्ट वार ठरवलेला असतो आणि त्या दिवशी औत जुंपले जात नाही, बैलांना विश्रांती दिली जाते. या नियमाचे पालन व्हावे म्हणून त्यामागे एखादे धार्मिक कारण सांगितले जात असले तरी त्यामागचा मूळ हेतू आपल्यासाठी राबणाऱ्या प्राण्यांना आठवड्यातून एक दिवस विश्रांती देणे हाच असतो.
प्राचीन संस्कृतीत सापडतात “पोळा” सणाचे धागे दोरे
प्राचीन काळी भारतात ज्याच्याकडे जास्त गोधन तो अधिक श्रीमंत, असं समजल्या जायचं. पशूधनावर रचलेल्या अनेक पौराणिक कथाही प्रसिद्ध आहेत. सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणांत स्पष्ट पणाने गोवंशाचे अस्तित्व जाणवते. घोडा हा तरी या देशात नंतरून आलेला प्राणी परंतु बैल हा अगदी सिंधूसंस्कृती आणि त्याही आधीपासून भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतीक समजल्या जातो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रांतून जो वृषभ दाखवलेला आहे तो न ठेचलेला वळू आहे. सिंधू संस्कृतीतील लोक पूजेसाठी काही न फोडलेले वळू बाळगीत असे दिसते. आजही महाराष्ट्रातील काही खेड्यातून गावासाठी पोळ सोडण्याची प्रथा आहे. न ठेचलेल्या वळूला ” पोळ ” असे म्हणतात. वरील पोळ शब्दावरुनच ” पोळा ” हा शब्द आला असावा. यावरून कृषी संस्कृतीशी निगडीत असलेल्या बैल तसेच कृषीशी निगडित इतर प्राण्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्राचीन काळी देखील एखादा असाच सण साजरा केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीयांचा महान पूर्वज असलेल्या शिवाचे वाहन नंदी आहे, हे या संदर्भात लक्षणीय आहे. बैलांप्रमाणे इतर अनेक पशूही प्राचीन काळापासूनच माणसाला वेगवेगळ्या मार्गांनी सहाय्य करीत आले आहेत. शिवाला पशुपतीनाथ असे गौरवाने म्हटले जाते, यावरून माणसाचे पशुंबरोबरचे जिव्हाळ्याचे आणि परस्पर सहकार्याचे नाते स्पष्ट होते. विशेषत्वाने बैलांविषयी आणि त्या जोडीने इतर पशुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने पोळा हा सण साजरा करण्याची प्रथा चालू झाली असावी असा सर्वार्थाने अंदाज बांधता येतो.
– तुषार मोरे