मुंबई : शेतजमीन विकत घेताना शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनी जमिनीची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये पहिली महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेतजमीन खरेदी करताना जमिनीचा डिजिटल सातबारा आणि फेरफार उतारा नीट तपासणे.
ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे. सातबाऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचींच आहे का ते पाहावे. त्यावर इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणं आवश्यक असतं. जमिनीवर कोणत्याही बॅंक किवा खासगी किंवा सहकारी संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची तपासणी करावी.
शेत जमिनीमधून रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, इत्यादी नियोजित नसल्याची खात्री करावी, कोणत्याही प्रकारचे सरकारी आरक्षण नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा खटला किंवा कोर्टाच्या केसेस, गहाणखत, नोटरी करून दिले असल्यास हेही तपासून पाहावं
याशिवाय जमिनीचे 1930 सालापासूनचे सातबारा आणि फेरफार उतारे तुम्ही पाहू शकता. तहसील कार्यालयातल्या अभिलेख कक्षात जमिनीच्या इतिहासाशी संबंधित ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. फेरफार उतारे पाहिल्यास सदर जमिनीच्या मालकी हक्कात वेळोवेळी कोणकोणती बदल होत गेले, याची माहिती देखील आपल्याला समजते.
एकदा का सातबारा उतारा हातात आला की त्यावर जी जमीन खरेदी करायची आहे, ती कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे तपासून घ्यावे. आपल्याला ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते. नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी. त्याचबरोबर जमीन खरेदी करताना जी जमीन खरेदी करायची आहे, तिथं जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही, त्याची देखील तपासणी करावी.