राज्यात आज मंत्रिमंडळाची (Cabinate Meeting) खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँका, खतांच्या किंमती, नुकसान भरपाई या विषयांवर विशेष चर्चा झाली. तसेच अगामी खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कसलीही अडचण येणार नाही. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिले.
” शिंदे-फडणवीस सरकार हे ‘बळीराजाचे सरकार’ आहे. बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी सरकार (Government) प्रयत्नशील असेल. हा खरीप हंगाम यशस्वीपणे जाण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. या हंगामात खतांच्या किंमतीत वाढ होणार नाही. तसेच विमा कंपन्यांकडून कसल्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक केली जाणार नाही. ” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करून कारवाई करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.