मुंबई : उपराष्ट्रपती पदासाठी शनिवारी मतदान होत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मागरिट अल्वा या उमेदवारी लढत आहेत. या दोघांमध्ये चांगलीच लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे मतदान होणार आहे. यानंतर लगेच मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून संध्याकाळी उशिरापर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची घोषणा करण्यात येणार आहे.
मागरिट अल्वा (Marguerite Alva) यांचे नाव घोषित करण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही प्रकारचे एकमताचे प्रयत्न झालेले नाहीत असा दावा करण्यात आला होता यानंतर मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा करण्यात आली यामुळेच विरोधी पक्षांमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून मतभेद निर्माण झालेले आहेत.
मागरिट अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पाठिंबा पाहता त्यांना जवळपास 200 तर जगदीप धनखड यांना आतापर्यंतचा मिळालेला पाठिंबा पाहता 515 मत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ नवीन उपराष्ट्रपती घेतील तर एम. व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.