मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन त्यांचं आज निधन झाले आहे. विनायक मेटे यांचे निधन मनाला चटका लावणारे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिली आहे.
खूप सामान्य कुटुंबामधून विनायक मेटे पुढे गेले होते. कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी कायम संघर्ष केला. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नेमका कसा झाला अपघात?
विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”