मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचसोबत निती आयोगाच्या बैठकीचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. यामुळेच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान दिल्लीतील अनेक नेत्यांची ते भेट घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना मिळाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंना महिन्यांहून अधिक कालावधी झाला तरीदेखील अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
यावरूनच अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. याचसोबत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयात 8 ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे. यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असून यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त ठरणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.