
दिल्ली : देशभरात सर्वांनाच महागाईला तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे. केंद्र सरकारकडून (Central Govt) जीवनावश्यक वस्तूंवर देखील जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळेच हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली उद्या काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता या मोर्चा मार्फत राजभवनाला घेराव घालण्यात येणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधला आहे. यावेळी नाना पटोले म्हणालेत की, महागाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अस असतानाच आता केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. याचसोबत शालेय वस्तूंवर तसेच रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे.
याचसोबत सरकारने देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त 4 वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी अग्निपथ नावाची योजना आणलेली आहे. या योजनेला सर्वच स्थरावर तरुण वर्ग तीव्र विरोध करत असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. यामुळेच ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे अस ते म्हणाले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलून महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) वारंवार अवमान करत आहेत. त्यांनी असे करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अस देखील ते म्हणाले आहेत.