
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यामधील राजकीय मतभेद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. या दोन्ही भावाबहिणीने एकमेकांवर राजकीय टीका केली आहे. त्यामुळे ही दोघे कधीच एकत्र येणार नाहीत अशा चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र सध्या आता राजकारणाच्या पटलावरती गणित बदलल्याचे पाहायला मिळत आहे. या बहिण भावातील दुरावा दूर झाला आहे. त्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळाला आहे.
बीडच्या परळी या ठिकाणी राज्य सरकारचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस हे उपस्थित होते. त्याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. परळी मध्ये आल्यानंतर या सर्व नेत्यांनी आधी गोपीनाथ गडाला भेट दिली त्यानंतर सर्वांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं.
या सर्व नेत्यांचा पंकजा मुंडे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन स्मृतीसळावर स्वागत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या स्वागत करण्यासाठी पुढे आल्या. त्याचवेळी धनंजय मुंडे यांना शाल देण्यासाठी पंकजा मुंडे जातात यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीची गळा भेट घेतली आणि बहिणीची पाठ थोपाटली. त्यावेळी पंकजा मुंडेही भारावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दोन्ही भावाबहिणी मधील दुरावा दूर झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.