सातारा : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या अनेक दौरे करत आहेत. ते प्रत्यक्ष पाहणी करून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील बाधित गावांचे पुनर्वसन तसेच राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण केंद्र याबाबत बैठक झाली. या बैठकीस माजी राज्यमंत्री तथा आमदार संभूराजे देसाई उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणाऱ्या आपत्तींच्या मुकाबल्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल असावे. त्यासाठी पाटण तालुक्यातील या प्रस्तावित दलासह पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.