गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय : वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्र : सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस, मेथी घास यासारख्या पिकामध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने गोगलगायींवर उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सायंकाळी आपल्या शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी गोळा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.

शेतामध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी वाळलेल्या गवताचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.

शेतकऱ्यांनी शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.

गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड हे दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. त्याचबरोबर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.

जर तुमच्याकडे मेटाल्डिहाईड दाणेदार उपलब्ध नसेल तर दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्‍झाम ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे.* हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. असे केल्याने देखील गोगलगाय नष्ट होऊ शकतात.

अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *