गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील महत्त्वाचा सण मानला जातो. अनेक शुभ कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाची खास ओळख आहे. याला चैत्र शुद्ध प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. गुढीपाडव्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. घरात गोडधोड केले जाते. उद्या ( ता.22) गुढीपाडवा आहे. दरम्यान उद्या गुढी उभारण्यासाठी शुभमुहूर्त कोणता व गुढी नक्की कशी उभारावी? हे जाणून घेऊयात.
गुढीपाडव्यासाठी शुभमुहूर्त कोणता?
उद्या म्हणजेच बुधवारी 22 मार्च ला तिथीनुसार गुढीपाडवा साजरा होणार आहे. उद्या गुढी उभारण्यासाठी व गुढीची पूजा करण्यासाठी सकाळी 06:29 ते सकाळी 07:39 पर्यंत चांगला मुहूर्त आहे. या मुहूर्तावर गुढी उभारून पूजा केल्यास अधिक लाभदायक ठरेल. ( Gudhipadhwa 2023)
गुढी उभारण्यासाठी व पूजेसाठी कोणते सामान लागते?
उद्या तुम्हाला प्रत्येकाच्या घरासमोर विविध रंगांच्या गुढ्या दिसतील. यासाठी वेळूची काठी ( बांबू), कडुलिंबाची पाने, आंब्याच्या झाडाची पाने, स्वच्छ धुतलेले तांब्याचे कलश, काठापदराची रंगीत साडी, एक ब्लाऊज पीस, बाजारात मिळणारा साखरेचा हार, नारळाच्या खोबऱ्याचा हार, एक लाल कलरचा धागा, चौरंग अथवा पाठ आणि फुलांचा हार हे साहित्य गुढी उभारण्यासाठी लागते. तसेच गुढीच्या पूजेसाठी कलश हळदी-कुंकू, थोडे तांदूळ, पाणी, पंचामृत, साखर, चंदन, फुले, पंचारती, कापूर, अगरबत्ती किंवा धूप, खाऊची पाने आणि सुपारी हे साहित्य आवश्यक आहे.
गुढी उभारण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम वेळूची काठी स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्या काठीवर साडी आणि ब्लाऊज पीस दोरीने बांधून घ्या.
सोबतच आंब्याची पानं आणि कडुलिंब सुद्धा बांधा. त्याला आता साखरेची माळ आणि फुलांचा हार घाला.
तसेच कलशावर पाच हळदीकुंकाचे बोट लावून स्वास्तिक काढा व कलश काठीवर पालथे घाला.
त्यानंतर ही गुढी घरासमोर पाट किंवा चौरंगावर उभी करा. यानंतर कुटुंबासोबत तिची पूजा करा.