Agriculture News । अहमदनगर : ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain Update) दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. अनेक भागात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे चारा टंचाई (Fodder shortage) निर्माण झाल्याने दूध व्यवसाय धोक्यात आला आहे. एकीकडे चारा टंचाई तर दुसरीकडे कोसळलेल्या दुधाच्या दरांमुळे (Milk Price) शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. (Latest Marathi News)
Rain Update | पावसाने मोडला तब्बल १२२ वर्षांचा रेकॉर्ड, क्षणांतच इमारती जमीनदोस्त
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव या गावातील नागरिकांचा शेती आणि दूध व्यवसायावर (Milk business) उदर्निवाह चालतो. मागील दोन महिन्यापासून या गावाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चाऱ्याअभावी दररोज 12 ते 13 हजार लिटर संकलन होणाऱ्या दुधात एकूण 4 हजार लीटरने घट झाली आहे.
मागील वर्षी या गावात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशातच यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज (Loan) काढून जनावरांची खरेदी केली आहे. परंतु त्यांच्यावरच चारा टंचाईचे संकट निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
अशातच या जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात चारा नेण्यास बंदी घातली आहे. शेतकऱ्यांना काही ठिकाणी जास्त किंमत देऊन ओला चारा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने या समस्येवर लवकरात लवकर उपाय काढावा असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.