मुंबई : ईडीचे पथक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील ‘मैत्री’ निवासस्थानी ईडीचे पथक तपास करत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. चाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचीही चौकशी सुरू आहे.
छाप्याची माहिती मिळताच संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की… खोटी कारवाई, खोटे पुरावे… मी शिवसेना सोडणार नाही. मी मेलो तरी शरण जाणार नाही. माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही.
यापूर्वी राऊत यांना ईडीने 1 जुलै रोजी चौकशी केल्यानंतर 20 आणि 27 जुलै रोजी समन्स बजावले होते, परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने ते 7 ऑगस्टनंतरच हजर राहू शकतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी पाठवली होती. याप्रकरणी ईडीने राऊत यांची दादर आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. राऊतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते.
संजय राऊत यांच्यावर काय आहे खटला?
1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. ईडीने त्यांना अनेकवेळा समन्स बजावले आहेत. पण या ना त्या कारणाने राऊत ईडीसमोर हजर होत नाहीत. यापूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा दाखला देत ईडीकडे हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.