मुंबई : एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ( Eknath Shinde) यानंतर बंडखोरी केलेल्या नेत्यांकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत होती. संजय राऊतांवर देखील मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून हल्लाबोल केला जात होता.
अस असतानाच उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) आदर असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख न करता फक्त माजी मुख्यमंत्री असा केला होता. यानंतर राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल ( election) जाहीर करण्यात आला असून एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एक ट्विट केलेले आहे.
“राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.” अश्या आशयाचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
हे ट्विट करताना एक पोस्टर देखील त्यांनी शेअर केलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचा फोटो या पोस्टरवर आहे. यासोबत त्यांनी 271 ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी देखील ट्विटमध्ये सांगितलेली आहे.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे अस त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितलेले आहे.