Maratha reservation । मराठा समाजासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेतले आहे. यावर आता ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
“मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांनी एक प्रकारे ही लढाई जिंकली, पण ते तहामध्ये हरले असल्याचे चित्र उभे ठाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित बहुजन आणि बारा – बलुतेदार समाजाची ताटातील १७ भाकरी खाण्यामध्ये असा त्यांनी कोणता मोठा विजय मिळवला आहे”, असा सवाल ओबीसी नेते, माजी खासदार हरीभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी विचारला आहे. (Haribhau Rathod on Maratha Reservation)
“जर मनोज जरांगे यांच्या लढ्याला जर यश आले आहे तर निश्चितच मंत्री छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal) प्रकाश शेंडगे आणि ओबीसींच्या लढ्याला अपयश आले आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिले आहेत. काही झाले तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे सरकार सांगत होते. पण तसे झाले नाही. याला जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेते जबाबदार आहेत. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”, अशी संतप्त मागणी देखील राठोड यांनी यावेळी केली आहे.