मुंबई : एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापण केलं. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होताना दिसतोय. याच पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला आहे. आता या फोटोवरून एकनाथ शिंदेंवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. आता यावर श्रीकांत शिंदेनी स्पष्टीकरण दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले, ” ही आमची घरातली तात्पुरती व्हीसीसाठी व्यवस्था केलेली आहे. बाहेर मुख्यमंत्र्यांचा बोर्ड लावलाय, त्यामुळे यामधून कोणताही वेगळा अर्थ काढू नये. मुख्यमंत्र्याचा बोर्ड मागे असल्याची मला कल्पनाही नव्हती. सर्व गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. पण याची जास्त चर्चा करायची गरज नाही. मी देखील खासदार आहे त्यामुळे मला, कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं चांगलाच समजत”.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत (Ravikant Varpe) वरपे यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. आणि सोबतच कॅप्शन मध्ये लिहिले की, ” खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?” अशा शब्दांमध्ये रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जोरदार टीका केली आहे.