मुंबई : भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat)यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त गिरीश बापट यांनी पुण्यात (pune) माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना भाजपसह(BJP) सर्वच राजकीय पक्षांवर नाराजी व्यक्त केली. गिरीश बापट म्हणाले की, सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष (party)प्रवेश दिला जातो. तसेच सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. आणि भाजप देखील सत्तेची गणिते जुळवत आहे. सच्चे कार्यकर्ते पक्षात राहिलेले नाहीत. त्यामुळे मी भाजप पक्षावर नाराज आहे.
शेतकऱ्यांनो आता कायमचे वीजबिल वाचवा, घ्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ
पुढे बापट म्हणाले की, राजकारण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढेच आता कार्यकर्त्यांचे ध्येय राहिले आहे. आता अस झालंय की प्रत्येक कार्यकर्त्याला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे त्यामुळे त्यांच्यात तशी चढोओढ लागली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्त्याने गोरगरीबांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱयावर दिसणारे समाधान पहाणे महत्त्वाचे आहे.
कार्यकर्ता नसेल तर पक्ष कसा उभा राहिल? मात्र आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही. नेत्यांचे हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे. ही बाब माझ्या मनाला पटत नाही. म्हणून मी सर्वच पक्षांवर नाराज आहे, असे गिरीश बापट म्हणाले.