
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे. मेटेंच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वचजण धक्कामध्ये आहेत. यावर अनेकजण श्रद्धांजली वाहत आहेत तर काहीजण प्रतिक्रिया देखील देत आहे. आता यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात एक अत्यंत मोठे विधान केले आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, विनायक मेटेंचा रात्रभर प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे असल्यामुळे रात्रीचा प्रवास सुरू होता. माझ्या म्हणण्यानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात घडला असावा, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
नेमका कसा झाला अपघात?
विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”