मुंबई : साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे येथे एका वाढदिवसानिमित्त शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती. राजकारणासह अनेक गोष्टींवर आपल्या भाषणात त्यांनी यावेळी टोलेबाजी केली. बघुयात ते काय म्हणाले. “मी कोणालाही व्यक्तिगत नाव ठेवत नाही. एका घरात जर राजकारण शिरलं तर घोटाळा होतोच होतो. आजोबा आमदार, बाप आमदार आणि नातू पण आमदार अशी महाराष्ट्रात दीडशे घराणी आहेत. ही लोकं राजकारणातून हलायला तयार नाहीत. मोहिते पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज बाबा हलत नाहीत. अशी घराणे नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत मोजली तर शंभर ते सव्वाशे निघतील. 288 मतदारसंघातले 125 बाजूला काढा. राहिलेल्या खऱ्या निवडणुका. आणि यातूनच ठरवायचं शिवसेना (shivsena) पुढं का भाजप (bjp) पुढं, असं परखड मत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी व्यक्त केले.
शिंदे गटातील घराणेशाहीच काय ?
शिंदे गटातील घराणेशाही संपवायची आहे, अशी चिठ्ठी शहाजी बापूंना या कार्यक्रमात आली तेव्हा यावर त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ते असे म्हणाले की, “आधी गट तर नीट पडू देत मग बघू.” माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलंय. पण मलाच 5 वर्षात शिवसेना कळाली नाही”, त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये हास्य कल्लोळ झाला.
स्थानिक मुद्यावर काय म्हणाले शहाजी बापू,
ऊस तोडीचा टोळ्या, नालासोपारा सारख्या ठिकाणी माती उचलण्याचं काम करणारे, गोव्यात गंधकाच्या खाणीत काम करणारे लोक हे सर्व सांगोला तालुक्यातील आहेत. याचे खूप दुःख वाटतं. पण हे सर्व संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यासाठी मी जिद्दीने निवडणूक लढलो, असं त्यांनी सांगितलं. आपल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात कधीही चुकीचा फोन पोलीस स्टेशनला केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मुलाखत घेणे हा प्रकार बोगस असतो सर्व आधीच मॅनेज असतं. यामध्ये शरद पवार एकदम भारी… एकाच मतदारसंघात दहा जणांना आधीच कामाला लावतात, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला. अपशिंगे गावात सहजासहजी कमळ फुलणार नाही. राष्ट्रवादीवाले खूप चालू आहेत. पण प्रयत्न करत राहायचं. आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे, असं यावेळी ते म्हणाले.