मुंबई : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आपण शिक्षण घेतो, नोकरी शोधतो, उत्तम काम करतो मात्र लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश दिला आहे, अशी टीका सुबोध भावे यांनी केली होती. आता यावर स्पष्टीकरण देत सुबोध भावे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.
सुबोध भावे यांनी कार्यक्रमातील व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. (कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो.पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.आपला, सुबोध भावे जय हिंद! जय महाराष्ट्र!
सध्या त्यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.