मुंबई : 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता भारतीय महिला संघाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियन संघासोबत (INDW vs AUSW,) होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय क्रिकेट संघ प्रथमच सुवर्णपदकाचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
आता भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्यात यशस्वी होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसे, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अंतिम सामने झाले आहेत ज्यात कांगारू महिला संघ विजयी ठरला आहे.
2020 T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. आता अशा परिस्थितीत भारतीय महिला संघ त्या पराभवाचा बदला घेऊ शकेल का? या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लीग स्टेजमध्ये स्पर्धा झाली ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील हेड टू हेड सामन्याबद्दल बोलायचे तर, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय महिला संघाने केवळ 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने 17 सामने जिंकले आहेत. एका सामन्यात निकाल लागला नाही. अशा स्थितीत आज भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक जिंकण्यासाठी मैदानावर आपले 100 टक्के झोकून द्यावे लागणार आहे.