मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवन या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊ जण आणि भाजपातू नऊ जण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. आता या विस्तारावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“उशिरा का होईना पण महाराष्ट्राला मंत्रिपद मिळालं. आता सरकारने राज्यातील जनतेच्या अडचणी सोडवाव्यात, राज्यात अनेक प्रश्न आहेत. पण काही प्रकरणात ज्या लोकांना अजून क्लीनचीट मिळाली नाही अशा लोकांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असंत.” अस अजित पवार म्हणालेले आहेत.
भाजपमधून गिरीश महाजन ,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे , राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर शिंदे गटातील तानाजी सावंत , उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार , दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड , गुलाबराव पाटील या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. दरम्यान, राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार देखील हळूहळू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.