कर्जत : अहमदनगरच्या कर्जत (Karjat) शहरात प्रतिक पवार (Pratik Pawar) या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये प्रतिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिकवर हल्ला झाल्यानंतर कर्जतमध्ये सामाजिक वातावरण चांगलंच तापलं. या घटनेसंदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या पथकानेही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी येथे केली. आणि यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते.
आमदार राणे व आमदार पडळकर यांनी सोमवारी दुपारी हल्ला प्रकरणात जखमी झालेल्या प्रतीकची नगर शहरातील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि कर्जतमध्ये तपासी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, फिर्यादीने ‘आय सपोर्ट नूपुर शर्मा’ असे स्टेटस व्हाट्सअॅपवर ठेवले. नंतर ‘तुला हिंदूंचा फार किडा आला आहे का, तुझा उमेश कोल्हे करणार’ असा म्हणत त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा या घटनेकडे खूप गांभीर्याने पाहत आहेत.