
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवन या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊ जण आणि भाजपातू नऊ जण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. आता या विस्तारावरून किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यांच्या पक्षामध्ये दोन-तीन महिला आहेत. त्यापैकी एकही मंत्रीपदासाठी लायक नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “बोल गया सबकुछ लेकींन याद नही अब कुछ, अशी सरकारची परिस्थिती आहे. आम्ही किती संवेदनशील आहोत, याचं एक चित्र निर्णाण केलं गेलं होतं. पण, आता तो भोपळा फुटला आहे. यांच्या मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र, एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली. त्या व्यक्तीला मंत्रीमंडळात घेण्यात आले आहे.”
दरम्यान, भाजपमधून गिरीश महाजन ,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे , राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर शिंदे गटातील तानाजी सावंत , उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार , दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड , गुलाबराव पाटील या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. दरम्यान, राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार देखील हळूहळू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.