मुंबई : ‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरील मालिका घराघरांत प्रसिद्ध आहे. या मालिकेमधून अभिनेत्री कुंजिका काळविंट प्रसिद्धीच्या झोझात आली आहे. सध्या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती गणेश मूर्ती तयार करताना दिसत आहे.
कुंजिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “साध्या मातीला येणारं देवपण श्रध्देने जागृत होतं, त्या मूर्तीचं तेज म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीकाराने कलेपोटी त्यात फुंकलेले प्राण! कलेचं सौंदर्य समृद्ध असतं त्यात आव नाही तर असतो तो निर्मळ भाव… दरवर्षी ख्यातनाम मूर्तिकार ‘मादुस्कर गणपती’कडून आमच्या घराची मूर्ती तयार होते. पण, यावर्षी ती घडवण्याचा प्रयत्न आपण करावा असं ‘मादुस्कर गणपती’चे गणेश मादुस्कर यांनी सुचवले आणि बाप्पाने ते प्रत्ययास आणून घेतलेच!”
पुढे तिने लिहिले की, “गणेश मादुस्कर यांच्या मार्गदर्शनाने मी हि मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाची जाण ठेऊन इको-फ्रेंडली लाल मातीचा वापर केला आहे. त्याच्या साच्यांपासून, त्याच्या हात-पायाला आकार देणे, त्याच्या आसनासाठीचे सिंहासन, त्याच्या हातावरचा मोदक, त्याचे भावपूर्ण, तेजस्वी पण अतिशय प्रेमळ डोळे हे सगळं साकारताना आपल्या हातून देव घडतोय ह्याचं खूप अप्रूप वाटलं.”
कुंजिका काळविंटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत कुंजिकाचं कौतुक करत आहेत.