Loksabha Election । लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हाणामारी झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. धाराशिव, हातकणंगले आणि सांगोला या ठिकाणी हाणामारी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
धाराशिवमध्ये हाणामारीत एकाच मृत्यू
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले असून एक जणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेला व्यक्ती हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे. भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी मतदान केंद्रावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे पाच ते सहा कार्यकर्ते या हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिंदे गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
हातकणंगलेत ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात तूफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान देखील काही काळासाठी थांबवावे लागले. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी असल्याचा दावा धैर्यशील माने यांच्या गटाने आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि गोंधळ घातला त्यामुळे मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले. यांनतर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
सांगोल्यात दोन गटात राडा
सांगोला तालुक्यातील मुहुद या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायकी माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.