Manoj Jarange Patil । मागच्या काही दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणानंतरच ओबीसी समाज देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहेत.
मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते आपल्या प्रत्येक सभेतून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना आपल्याला पाहायला मिळत. दरम्यान येवल्यामध्ये गाव बंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांना शांत करा नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण म्हटलं की विरोध चालू झाला आहे. अनेक जण मराठा खेकड्यासारखे असल्याचे म्हणायचे पण आता करोडो बांधव एकत्र आले आहेत. ही लाट आता थांबणार नाही, तो म्हातारा कसेही बोलत आहे. आपण कुणाचं नाव घेत नाही त्याची लायकी देखील नाही की आपण त्याचं नाव घ्यावे. असे देखील यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.